महाविद्यालयांकडून लॉकडाऊनमध्ये शिक्षण शुल्क भरण्याची सक्तीमुळे विद्यार्थी कर्जबाजारी!

प्राची जाधव

मुंबई: कोविड -१९ च्या प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील नागरिकांना आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच या आर्थिक परिस्थितीमूळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन आणि विद्यापीठाची फी भरण्यास अडचण येत आहे. आणि अशा वेळी शैक्षणिक संस्था आणि शासकीय अधिकाऱ्यांनी  फी भरण्यास काही विशिष्ठ सवलत न दिल्यामुळे अनेकांना कर्ज काढावे लागल्याची बाब समोर आली आहे.

 प्रादुर्भावच्या काळात विद्यापीठे व महाविद्यालये अद्याप बंद आहेत पण त्यापैकी बहुतेक महाविद्यालयांनी ऑनलाइन वर्ग घेण्यास सुरवात केली आहे. आरोग्य आणि आर्थिक संकटाच्या अश्या वेळी सुद्धा शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्काची मागणी थांबवली नाही.  

“जेव्हा पासून कुटुंबातील एकटेच कमवणार्‍या असलेल्या वडिलांची नोकरी गेली तेव्हापासून आम्हाला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात कॉलेज फीची आमच्यासाठी अजून तणावाची गोष्ट बनली. महाविद्यालयाला पैसे देण्यासाठी आम्हाला कर्ज घ्यावे लागले,” मुंबईतील परळ येथील एमडी कॉलेजमधील विद्यार्थिनी दिशा साळवी म्हणाली.

रायगडमधील लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधील अंतिम वर्षात अभियांत्रिकीच शिक्षण घेत असलेल्या सचिन पवार या विधार्थ्याने अशाच परिस्थितीतून जात असल्याची हकीकत मांडली.“आमच्याकडे बँकेकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरला नव्हता,” तो म्हणाला.

२० ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना फी वाढवू नये आणि गरजू विद्यार्थ्यांना चार हप्त्यांमध्ये फी भरण्याची परवानगी देण्याचे निर्देश दिले.या निर्देशाने काही विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला, परंतु अनेकांना ही सवलत अपुरी असल्याचे वाटले.

एसआयईएस कॉलेज, सायन येथील तिसऱ्या वर्षी शिकणाऱ्या विद्यार्थिनी सायली जाधवने तिच्या पालकांना फी साठी पैसे मागितले असता त्यांनी नकार दिल्याचे कळविले. “जेव्हा मी त्यांना हप्ता सुविधेबद्दल सांगितले तेव्हाच त्यांनी फी देण्याचे मान्य केले,” ती म्हणाली.

राज्यातील बर्‍याच दुर्गम भागात ऑनलाईन वर्ग घेण्यास पुरेशी वीज व इंटरनेट सुविधा नसतानाही या भागातील महाविद्यालये विद्यार्थ्यांना फी भरण्यास भाग पाडत आहेत. “आमच्या महाविद्यालयाने हप्त्यांमध्ये फी भरण्यास परवानगी दिली होती परंतु फी दिली नाही तर परीक्षा देण्यास परवानगी दिली जाणार नाही अशी धमकी देण्यात आली,” असे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील बीकॉमचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी मनीषा पाटीलने सांगितले.

अनेक विद्यार्थ्यांचे मत आहे की लॉकडाऊन दरम्यान महाविद्यालयीन सुविधांचा लाभ घेत नसल्यामुळे महाविद्यालयाने त्यांचे शुल्क कमी केले पाहिजे. “वर्ग ऑनलाईन घेण्यात येत असल्याने महाविद्यालयांमध्ये क्रीडा खर्च, ग्रंथालयाची फी, सांस्कृतिक कार्यक्रम खर्च व वीज खर्च शिक्षण शुल्कात समाविष्ट करू नये”, असे जाधव म्हणाले.

फी कमी करण्यास किंवा आणखी सवलत देण्यास महाविद्यालयांनी नकार दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. “महाविद्यालयांनी त्यांच्या फीच्या निकषांमध्ये बदल केले पाहिजे. प्रत्येकजण आर्थिकदृष्ट्या स्थिर नसतो,” संकेत मोरे या विद्यार्थ्याने सांगितले.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.